पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 
वराहमिहीर
 

पहिल्या आर्यभटानंतर एक थोर खगोल शास्त्रज्ञ भारतात होऊन गेला. वराहमिहीरचा जन्म शके ४१२ ( इ. स. ४९० ) मध्ये झाला असावा. वराहमिहीर अवंती येथे वास्तव्य करीत असे. त्याने यवन देशात भ्रमंती करून खगोलशास्त्रविषयक ज्ञान संपादन केले असा एक प्रवाद आहे. परंतु त्यात तथ्य नाही. वराहमिहीराने ज्या विषयांवर लेखन केले आहे ते विषय भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी पूर्वीही हाताळले आहेत. त्यामुळे वराहमिहीरावरील आरोप टिकण्यासारखा नाही.

'पंचसिद्धांताचा ग्रंथ. '

वराहमिहीराने खगोलशास्त्रीय गणितावर 'पंचसिद्धांतिका' हा ग्रंथ लिहिला. त्यात पौलिश, रोमक, वसिष्ठ, सौर पितामह अशा पाच सिद्धान्तांचा अंतर्भाव आहे. हे पाचही सिद्धांत आजच्या सूर्यादी पाच सिद्धान्तांहून भिन्न होते. डॉ. वुलहर यांना काश्मीरमध्ये पंचसिद्धांतिकेच्या दोन प्रती मिळाल्या. त्यावरून ही गोष्ट सिद्ध होते. ह्या प्राचीन सिद्धान्तांपैकी वराहमिहीराच्या काळी पितामहसिद्धांत व वसिष्ठसिद्धांत विचारात घेतले गेले नाहीत. कारण त्यात संदिग्धता फार मोठी होती. रोमक व पौलिश सिद्धांत त्या मानाने बरेच स्पष्ट होते व सूर्यसिद्धांत सर्वात अधिक सुस्पष्ट होता. हे सिद्धांत इ. स. ४०० मध्ये प्रस्थापित झाले असावेत असे डॉ. थिबोंचे मत आहे, परंतु कै. शं. बा. दीक्षित ह्यांना ते शककाल पूर्वीचे वाटतात.

वराहमिहीराने पितामहसिद्धान्तानुसार अहर्गण नक्षत्र व दिनमान काढण्याच्या रीती सांगितल्या आहेत. पितामहसिद्धान्तातील ग्रहगणिताविषयी वराहमिहीराने काहीच सांगितले नाही. त्यात ग्रहगणित असावे असे ब्रम्हगुप्त म्हणतो. परंतु ते दृक्प्रत्ययी नसल्याने वराहमिहीराने ते दिले नसावे असा एक तर्क आहे. पंचसिद्धान्तीकेतील वसिष्ठसिद्धान्तात रवी व चंद्र ह्यांचाच केवळ विचार केला आहे. तिथी व नक्षत्रे काढण्याची रीती सांगितली आहे. रांश्यशकला ही माने त्यात आहेत आणि छायेचा बराच विचार केला आहे. दिनमानासंबंधीही विचार केलेला आहे. रोमक सिद्धान्तातही केवळ रवी व चंद्र ह्यांचेच गणित आहे. ह्या सिद्धान्ताची मूलतत्त्वे बाहेरून आली असावेत असा तज्ज्ञांना वाटते. इतर सिद्धान्तांप्रमाणे रोमक सिद्धान्तात ४३, २०, ००० वर्षाचे महायुग ही पद्धत नाही. रोमक युग २८५० वर्षाचे आहे. पंचसिद्धान्तीकेतील पॉलिश सिद्धान्तात मंगळादी ग्रहस्थिती सांगितल्या नाहीत, परंतु ग्रहाच्या वक्र, मार्गित्व, उदय व अस्त ह्यांचे विवेचन आहे. पौलिशसिद्धांताचे ३६५ दिवस २५ घटी ३० पळे आहे व त्याच प्रमाणे महायुगातील सायन दिवस १, ५७, ७९, १६, ००० असून राहू-भगण २, ३२, २२८ हून किंचित कमी होतात. दिनमान व रात्रीमान ह्यांच्यातील सारखेपणा, तिथी नक्षत्रांची निश्चिती, ग्रहणे वक्रमार्गित्व ह्यांचाही विचार त्यात केलेला आहे.

वराहमिहीराने पंचसिद्धान्तीकेत सूर्यसिद्धान्ताला सर्वात अधिक महत्त्व दिले आहे. मूल सूर्यसिद्धान्तात युगपद्धती असून कलियुगाचा प्रारंभ गुरुवारी मध्यरात्री मानला आहे. म्हणजे त्यावेळी रवी-चंद्राचे भोग पूर्ण होते. आपल्या सर्वसामान्य युगपद्धती नुसार कलियुगाचे मान ४, ३२, ००० वर्ष समजतात. द्वापार, त्रेता, कृत, कलियुग ही युगे ह्यांच्या अनुक्रमे दोन, तीन, चारपट आहेत. ह्या चारी युगांना मिळून एक महायुग होते व अशी १००० महायुगे मिळून एक कल्प किंवा ब्रम्हदेवाचा दिवस होतो. कल्पात चौदा मनू होतात. कल्पारंभापासून वर्तमान महायुगारंभापर्यंत सहा मनू व सत्तावीस महायुगे गेली व अठ्ठावीसाव्यातील कृत, त्रेता, द्वापार ही तीन युगे संपून आता कलियुग चालू आहे. प्रत्येक मनू एकाहत्तर महायुगांचा असतो. पंचसिद्धान्तीकेतील भगण आदी संख्या व आजचे वर्षमान एकमेकांशी जुळत नाहीत. सूर्यसिद्धान्ताचा संबंध टोलेमीशी असावा. असे वेबर ह्याला वाटते. परंतु त्याच्या आक्षेपात मुळीच तथ्य नाही ही गोष्ट कै. शं. बा. दीक्षित यांनी साधार सिद्ध केली आहे.

वराहमिहीराचे 'बृहतजातक' व 'लघुजातक' हे ग्रंथ आजही प्रचारात आहेत. त्यातील फलज्योतिषाचे आकर्षण कायम असल्याने त्याची उपयुक्तता वाढत गेली. वराहमिहीराच्या बृहत्संहिता ग्रंथाचे भाषांतर डॉ. केर्न ह्यांनी इंग्रजीत केले आहे.

वराहमिहीराच्या संहिताग्रंथावरून त्याच्या वैज्ञानिक प्रतिभेची आणि कल्पकतेची साक्ष पटते. त्याने पदार्थाच्या गुणधर्मांचा विचार केला. सृष्टिचमत्कारांचा अर्थ वास्तव दृष्टिकोनातून लावण्याचा प्रयत्न त्याने केला. पदार्थाचे गुणधर्म व्यावहारिक पद्धतीने कसे उपयोगात आणावेत त्याचे विवेचन त्याने केले.

वराहमिहीराने म्हटले आहे :

पञ्च्महाभूतमयस्तारागणपञ्जरे महीगोलः ।
खेऽय स्कांतांतःस्थो लोह इवावस्थितो वॄत्तः ॥

पुष्कळशा लोहचुंबकांनी खेचलेला लोखंडाचा गोळा ज्याप्रमाणे ( अधांतरी ) त्याच्या मध्यभागी स्थिर राहतो. त्याचप्रमाणे हा पृथ्वीगोल ( पंचमहाभूतांनी वेढलेला ) तारांगणाच्या पिंजर्‍यात म्हणजे भूगोलात स्थिर आहे.

वराहमिहीराने बृहदसंहितेत 'केतूचार' नामक अध्यायात वारंवार दिसणार्‍या धूमकेतूंचे आश्चर्यकारक वर्णन केले आहे. त्यात त्यांचे स्वरूप, संख्या, शुभाशुभ फले ह्यांचे विवेचन आहे. आज ज्याप्रमाणे शोधकाच्या नावावरून धूमकेतूस नाव दिले जाते त्याच प्रमाणे उद्यालक, कश्यप, पद्मकेतू अशी ऋषींची नावे वराहमिहीराने या धूमकेतूंना दिलेली आहेत. त्या त्या ऋषींची नावे संबंधीत धूमकेतूंचा शोध लावला म्हणून दिली असावीत व वराहमिहीराने केलेली धूमकेतूची वर्णने अगदी अद्ययावत वाटतात. एका धूमकेतूचे वर्णन करताना तो म्हणतो : चलकेतू प्रथम पश्चिमेस दिसतो. त्याची शिखा दक्षिणेस असते व ती तिकडे एक अंगुल उंच असते. तो जसजसा उत्तरेस जातो तसतसा मोठा दिसतो. सप्तर्षी, ध्रृव आणि अभिजित ह्यांस स्पर्श करून तो मागे फिरतो व आकाशाच्या अर्धाचे आक्रमण करून दिसेनासा होतो. बृहत्संहितेचा टीकाकार भटोत्पल ह्याने केतूचार अध्यायाच्या टीकेत पराशर ऋषींची धूमकेतूंच्या संदर्भातील वर्णने दिली आहेत. काही धूमकेतूंचा कालावधीही स्थूलामानाने दिला आहे. वराहमिहीराने उघड्या डोळ्यांनी सौरडागांचे निरीक्षण केल्याचा उल्लेख बृहत्संहितेत केला आहे.

वराहमिहीराने पंचसिद्धान्तीकेत काही स्वयंवह यंत्राचे प्रकारही सांगितले आहे. वराहमिहीराच्या वैज्ञानिक प्रतिभेचे दर्शन ह्या उदाहरणात घडते. वराहमिहीराने खगोलशास्त्राची विविध अंगे विकसित करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या वैज्ञानिक विचारांच्या दिशेने भारतीयांनी वाटचाल केली असती तर भारत विज्ञानाच्या क्षेत्रात पूर्वीच निश्चित आघाडीवर दिसला असता.

 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी