पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

ध्रुवतार्‍याचे स्थान अढळ नाही

 

ध्रुवबाळाची गोष्ट आपण लहानपणीच ऐकलेली असते. सावत्र आईच्या तिरस्कारामुळे ध्रुवबाळाला राजा असलेल्या त्याच्या वडिलांच्या शेजारी बसण्यास मनाई केली जाते आणि मग त्याच रागाने ध्रुवबाळ आपल्याला कुणीही हालण्यास सांगू नये अशा अढळ स्थानाच्या शोधासाठी जंगलामध्ये निघून गेला. जंगलामध्ये तप केल्यानंतर प्रसन्न झालेल्या देवाकडे ध्रुवबाळाने आपणास कुणी हाकलू नये असे अढळ स्थान अशी मागणी केली. देवाने त्याला आकाशातील एका अशा तार्‍याचे स्थान दिले जे अढळ होते. इतर सर्व तारे जरी आपल्या जागेवरून सरकताना दिसत असले तरी ध्रुवतारा एकाच ठिकाणी असतो. लहान वयामध्ये ध्रुवबाळाने केलेल्या धाडसाची कथा आपणा सर्वांनाच माहीत आहे.

पृथ्वीवर उत्तर गोलार्धामध्ये उत्तर दिशेस पाहिल्यास क्षितिजापासून थोडासा वर (मुंबईतून साधारण १९ अंश) आपणास ध्रुवतारा दिसतो. बर्‍याच लोकांना ध्रुवतारा तेजस्वी असावा असे वाटते, पण प्रत्यक्षात तो दिसायला एक साधारण तारा आहे. संपूर्ण रात्रभर इतर तार्‍यांप्रमाणेच ध्रुवतार्‍याचे निरीक्षण केल्यास आपणास असे आढळेल की इतर सर्व तारे पुढे सरकतील पण ध्रुवतारा मात्र त्याच ठिकाणी असेल. (याचा अर्थ तो स्थिर आणि अढळ आहे असा होत नाही.)

प्रत्यक्षात ध्रुवतारा स्थिर नाही. हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. एका मोकळ्या जागी उभे राहा. आता समोर कुठल्याही एखाद्या गोष्टीकडे तोंड करून उभे राहा. आता आपल्याभोवती एक फेरी मारून पुन्हा त्याच गोष्टीच्या समोर या.  आपणास कळेल की सुरुवातीला आपल्यासमोर असलेली ती गोष्ट आपली फेरी पूर्ण झाल्यानंतर आपणास दिसली म्हणजेच जेव्हा आपण फेरी मारताना ती गोष्ट जेव्हा आपल्या पाठीमागे गेली तेव्हा ती दिसत नव्हती तर जेव्हा आपली फेरी पूर्ण झाली तेव्हा ती गोष्ट आपणास पुन्हा दिसली. अशाप्रकारे आकाशातील तारे पृथ्वीच्या गोल फिरण्याने कधी एका बाजूला तर कधी पृथ्वीच्या दुसर्‍या बाजूला जातात. त्यामुळे ते कधी दिसतात तर कधी दिसत नाहीत.

आता वर सांगितलेलेच उदाहरण परत वेगळ्या पद्धतीने पाहूया. इथे आता आपण घरामध्ये डोक्यावर असलेल्या दिव्याखाली उभे राहूया. आता उभ्याच स्थितीमध्ये वर डोक्यावरील दिव्याकडे पाहत त्याच प्रकारे आपल्याभोवती एक फेरी मारा. आपणास कळेल की फेरी मारताना देखिल डोक्यावरील दिवा आपण वर पाहत असल्याने एकाच ठिकाणी होता. म्हणजेच डोक्यावरील तो दिवा आपल्या शरीराच्या अक्षाच्या दिशेने असल्याने तो एकाच ठिकाणी दिसतो.

अशाप्रकारे पृथ्वी स्वतःभोवती म्हणजेच तीच्या अक्षाभोवती फिरते तेव्हा तीच्या अक्षाच्या दिशेने असलेला तारा आपणास स्थिर जाणवतो. सध्या उत्तर ध्रुवाच्या अक्षाच्या दिशेने ध्रुवतारा असल्याने तो स्थिर जाणवतो.

खालील चित्रामध्ये आपणास कळेल की ध्रुवतारा कशाप्रकारे पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाच्या अक्षावर असल्याने तो आपणास स्थिर दिसतो.

पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि त्याच सोबत ती सूर्याभोवती फिरते या व्यतिरिक्त पृथ्वीची अजून एक गती आहे म्हणजे 'परांचन गती' (इंग्रजीमध्ये तिला Precession Motion)  असे म्हणतात. पृथ्वी सरळ उभी नसून ती तीच्या अक्षाभोवती २३.५ अंशाने कललेली आहे.  

पृथ्वीचा अक्ष सरळ नसून तो २३.५ अंशांनी कललेला आहे.

खालील चित्रामध्ये पृथ्वीच्या अक्षाची फेरी दाखविली आहे.

या तिसर्‍या गतीमध्ये पृथ्वी स्वतःभोवती फिरते तो पृथ्वीचा कललेला अक्ष देखिल फिरतो. या पृथ्वीच्या कललेल्या अक्षाला एक फेरी पूर्ण करण्यासाठी जवळपास २६,००० वर्षे लागतात. या २६,००० वर्षांमध्ये पृथ्वीचा अक्ष आकाशामध्ये एक फेरी पूर्ण करताना तो अक्ष निरनिराळ्या दिशेने रोखला जातो आणि ज्यावेळेस या पृथ्वीच्या अक्षाच्या फेरीमध्ये एखादा तारा येतो तेव्हा तो तारा काळातील पृथ्वीचा 'ध्रुवतारा' म्हणून ओळखला जातो.

खालील चित्रामध्ये अंतराळातील तार्‍यांच्यामध्ये पृथ्वीचा कललेला अक्ष दाखविले दाखविला असून तो फेरी पूर्ण करताना कशाप्रकारे इतर तारे त्याच्या जागेमध्ये आल्याने तो तारा पृथ्वीचा ध्रुवतारा बनतो.

खालील चित्रामध्ये परांचन गतीच्या म्हणजेच पृथ्वीच्या कललेल्या अक्षाला २६,००० वर्षांमध्ये पूर्ण करण्याचे रिंगण दाखविले असून सध्याच्या इ. स. २००० या काळामध्ये रिंगणातील वरील जागेमध्ये सध्याचा ध्रुवतारा आहे. तर याआधी कालेय तारकासमुहातील 'ठुबान' हा तारा पृथ्वीचा ध्रुवतारा होता. तर यानंतर जवळपास १२,००० वर्षांनी या रिंगणाजवळ स्वरमंडळ तारकासमुहातील 'अभिजित' हा तारा पृथ्वीचा ध्रुवतारा असेल. म्हणजेच ध्रुवतार्‍याचे स्थान अढळ नाही. परांचन गतीचा फेरीमध्ये पृथ्वीचा ध्रुवतारा नेहमीच बदलला आहे. सध्याचा ध्रुवतारा हा देखिल काही काळाने बदलून भविष्यामध्ये दुसराच तारा ध्रुवतारा असेल.

सध्याचा ध्रुवतारा देखिल पृथ्वीच्या बरोबर अक्षावर नसून तो किंचितसा बाजूला असल्याने तो देखिल छोट्या जागेमध्ये फिरताना दिसतो.

खालील चित्रामध्ये आपणास दिसेल की रात्रभर केलेल्या तार्‍यांच्या छायाचित्रणातून इतर तार्‍यांचे एक रिंगण झाले आहे तर त्या रिंगणाच्या मध्यभागी एक छोटासे रिंगण आहे. प्रत्यक्षात ध्रुवतार्‍याचे रिंगण आहे. ध्रुवतारा पृथ्वीच्या बरोबर अक्षावर नाही त्यामुळे तो देखिल छोट्या जागेमध्ये फिरताना दिसतो.

पृथ्वीचा ध्रुवतारा हा फक्त पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातच नसून तो दक्षिण गोलार्धात देखिल असू शकतो. कारण पृथ्वीचा अक्ष हा दोन्ही बाजूस आहे. परंतु पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील अक्षाच्या परांचन गतीमुळे होणार्‍या आकाशातील रिंगणामध्ये सध्यातरी कुठलाही तेजस्वी तारा नसल्याने इथे सध्या ध्रुवतारा नाही. खालील चित्रामध्ये पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील अक्षाच्या परांचन गतीमुळे होणार्‍या आकाशातील रिंगण दाखविले आहे. जेथे सध्यातरी कुठलाही तेजस्वी तारा नसल्याने सध्या पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील ध्रुवतारा नाही.

 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी