टीप – वरील चित्रात आकाशातील ‘मृग तारकासमूह’ दाखविलेला आहे, जो इंग्रजीत ‘Orion’ या नावाने ओळखला जातो.
आकाशामध्ये तारे आपण नक्कीच पाहिले असतील. पण एकदा वेळ काढून जरा त्या ताऱ्यांचे ४-५ मिनिटांसाठी निरीक्षण करा. निरीक्षण करा म्हणजे आपल्याला विशेष काही करायचे नाही आहे. फक्त एखादा तारा बघताना त्याच्या आजूबाजूला असलेले तारे देखील बघा आणि नंतर त्या जवळजवळ असलेल्या काही ताऱ्यांना एकत्रित बघण्याचा प्रयत्न करा.
जेव्हा आपण त्या जवळजवळ असलेल्या काही ताऱ्यांना एकत्र पाहाल तेव्हा आपल्याला ते तारे एकत्र जणूकाही एखाद्या परीवाराप्रमाणे एकत्र असल्याचे जाणवतील. यालाच ‘तारकासमूह’ असे म्हणतात. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर, जे काही तारे आपल्याला रात्रीच्या आकाशात एकत्र असल्याचे वाटतात, त्या ताऱ्यांना एकत्रित पाहिल्यास एकत्र वाटणाऱ्या त्या ताऱ्यांचा समूहास ‘तारकासमूह’ असे म्हणतात.
तारकासमूह म्हणजेच काही ताऱ्यांचा एकत्रित समूह. परंतु याचा अर्थ ते तारे अंतराळात एकमेकांच्या जवळ असतील असे नाही. ते तारे फक्त आपल्याला पृथ्वीवरून पाहताना एकत्र दिसतात. प्रत्यक्षात मात्र ते सर्व तारे एकमेकांपासून शेकडो प्रकाशवर्षे दूर असू शकतात.
आता त्या तारकासमुहाचे निरीक्षण करताना थोड्या वेळाने याच जवळजवळ असलेल्या ताऱ्यांच्या ठिपक्यांना आपल्या कल्पनेने काल्पनिक रेषांच्या सहाय्याने जोडण्याचा प्रयत्न करा. काही क्षणातच आपल्याला त्या काल्पनिक जोडलेल्या रेषांपासून एखादी आकृती तयार झाल्याचे जाणवेल. जसे खालील चित्रात दाखविले आहे.
वर दाखविलेल्या चित्रामध्ये आकाशातील वृश्चिक तारकासमुहाचा आकृती आहे. या तारकासामुहाचा आकार एखाद्या विंचू प्रमाणे जाणवितो हे आपल्या लक्षात येईल. म्हणूनच या तारकासमुहाचे नाव वृश्चिक म्हणजेच ‘विंचू’ असे ठेवले आहे.
फार पूर्वीपासून आकाशातील अशाच निरनिराळ्या तारकासमुहांना त्यांच्या काल्पनिक आकारावरून नावे देण्यात आली आहे. अनेक शतकांमध्ये अनेक खगोलशास्त्रज्ञांनी आपापल्या कल्पनेने आकाशातील तारकासमुहांची विभागणी केली याचे कारण पृथ्वरील एकाच ठिकाणाहून आपण आकाशातील सर्वच तारे आणि तारकासमुह पाहू शकत नाही. शेवटी १९१९ मध्ये निर्माण झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संस्थेने’ (International Astronomical Union – IAU) ने अवकाशाच्या गोलाला पद्धतशीर सीमा असलेल्या ८८ तारकासमुहांमध्ये विभागले. तेव्हापासून आकाशातील सर्व ताऱ्यांचे मिळून अधिकृतरीत्या एकुण ‘८८ तारकासमुह’ असल्याचे मानण्यात येते.
८८ तारकासमुहांची यादी आणि त्यांचे आकाशातील स्थान जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
रात्रीच्या अवकाशामध्ये आपणास अनेक तारे दिसतात. ह्या विखुरलेल्या तार्यांना नंतर समूहांमध्ये विभागण्यात आले. ह्या समूहांना त्यांच्या काल्पनिक आकृतीनुसार नावे देण्यात आली. समूहामध्ये असलेले तारे जवळ जरी वाटत असले तरी प्रत्यक्षात मात्र एकमेकांपासून पुष्कळ लांब आहेत.
पृथ्वीवरून तार्यांना पाहताना आपण त्यांना एका सरळ रेषेमध्ये पाहत असतो त्यामुळे अवकाशातील एका विशिष्ट अंतराच्या प्रतलामध्ये आपणास ते एका समान अंतरावर समूहाने असल्याचा भास होतो.
वरील चित्रावरून आपणास कळेल की शर्मिष्ठा म्हणजेच Cassiopeia या तारकासमुहातील तारे एकत्र जरी वाटत असले तरी ते ५० ते ३२५ प्रकाशवर्ष एवढ्या प्रचंड अंतरामध्ये विखुरलेले आहेत.
चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे समोरून पाहिल्यास पुढे-मागे असलेले हे तारे एका सरळ प्रतलामध्ये आढळतात व त्यावरून ते सर्व तारे एकाच समूहातील असल्याचा भास होतो.
टीप :- फक्त विषय समजण्यापुरते वर शर्मिष्ठा तारकासमुहातील तारे ५० ते ३२५ प्रकाशवर्ष एवढ्या अंतरामध्ये विखुरलेले आहेत असे म्हटले आहे. प्रत्यक्षात शर्मिष्ठा तारकासमुहातील तारे ५४ ते ६१५ प्रकाशवर्ष एवढ्या अंतरामध्ये विखुरलेले आहेत. तर मृग तारकासमुहातील तारे २४३ ते १३५९ प्रकाशवर्ष एवढ्या प्रचंड अंतरामध्ये विखुरलेले आहेत. यावरून आपल्याला तारे एकमेकांपासून मोठ्या अंतराने दूर असताना पृथ्वीवरून पाहताना ते एकत्र समूहात दिसतात.