१२ राशी

१२ राशी

राशीचा उल्लेख झाला म्हणजे ज्योतिषशास्त्राचा विषय असणार असे प्रत्येकाला वाटते परंतु ‘अवकाशवेध’ ही वेबसाइट खगोलशास्त्रावरील अभ्यास करणार्‍यांसाठी असल्याने या विभागात राशी आणि खगोलशास्त्राचा जेवढा संबंध आहे तेवढीच माहिती देण्यात आली आहे.

पृथ्वीला सूर्य प्रदक्षिणा करण्यास ३६५ दिवस म्हणजेच एक वर्ष लागते. रात्री सूर्य आपल्या विरुद्ध दिशेला असल्याने आपणास तारे दिसतात. तर दिवसा सूर्य प्रकाशामुळे आपणास तारे दिसत नाहीत. पृथ्वीवरील वातावरणातील धुळीकणांमूळे सूर्य किरणे सर्वत्र पसरतात आणि सूर्यामागील तारे सूर्य प्रकाशात तारे लुप्त होतात. फार पूर्वीच्या खगोलशास्त्रज्ञांना एक गोष्ट आढळून आली ती म्हणजे रात्री सूर्य प्रकाश नसल्यामुळे आपणास तारे दिसतात तसेच दिवसा देखिल तारे आपल्याच जागी असतात. परंतु सूर्य प्रकाशामुळे ते आपणास दिसू शकत नाहीत. नंतर त्यांना असे आढळून आले की सूर्य आणि चंद्र नियमित पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळतात. फक्त रात्रीच्या चंद्राचा विचार केल्यास दररोज तो आपणास थोडासा पुढे म्हणजे पूर्वेकडे सरकलेला आढळतो. आपल्याला हे सरकणे त्या मागील तार्‍यांच्या जागेवरून कळते तसेच सूर्याच्या मागील तारे जरी दिसत नसले तरी त्याच्या उगवण्या आधी आणि मावळल्यानंतरच्या काही काळानंतर सूर्य देखिल आपल्या जागे वरून हाललेला दिसतो.

अवकाशाचा अभ्यास व्यवस्थित व्हावा म्हणून खगोलशास्त्रज्ञांनी अवकाशातील जवळ-जवळच्या तार्‍यांचा मिळून एक तारकासमूह, अशा प्रकारे दिसणार्‍या सर्व तार्‍यांना मिळून त्यांचे ८८ तारकासमूह तयार केलेत. नंतर त्यांना असे आढळून आले की ठराविक तारका समूह हे सूर्य-चंद्राच्या उगवण्याच्या आणि मावळण्याच्या मार्गावर आहेत. सूर्य ठराविक काळानंतर एका तारकासमुहामधून दुसर्‍या तारकासमुहामध्ये जातो. सूर्याच्या या मार्गावर एकूण १२ तारकासमूह असल्याचे आढळून आले. ह्याच तारकासमुहांना नंतर राशी असे नाव देण्यात आले. ह्या राशी म्हणजेच मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.

पृथ्वीचा अक्ष २३. ४५ अंशाने कललेला असल्याने सूर्याची उगवण्याची आणि मावळण्याची जागा दररोज थोड्या प्रमाणात बदलत असते ह्या सूर्याच्या मार्गाला आपण आयनिकवृत्त असे म्हणतात. सहा महिने सूर्य उत्तर पृथ्वीच्या ध्रृवीय भागात व सहा महिने दक्षिण पृथ्वीच्या ध्रृवीय भागात असतो. अशा प्रकारे वर-खाली सरकताना तो दोन वेळा पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या समान पातळीत येतो. त्यावेळेस दिवस-रात्र समान १२ तासांचे असतात. हे दिवस म्हणजे २१ मार्च ( ज्यावेळेस सूर्य पृथ्वीच्या उत्तर ध्रृवीय भागात प्रवेश करतो ) आणि २३ सप्टेंबर ( ज्यावेळेस सूर्य पृथ्वीच्या दक्षिण ध्रृवीय भागात प्रवेश करतो ). आपण विषुववृत्तावर असाल तर ह्या दोन दिवशी सूर्य दुपारी १२ वाजता बरोबर डोक्यावर असतो. २१ मार्च ह्या दिवशी सूर्य ज्या बिंदूवर असतो त्यास ‘वसंतसंपात’ म्हणतात तर २३ सप्टेंबर ह्या दिवशी सूर्य ज्या बिंदूवर असतो त्यास ‘शरदसंपात’ असे म्हणतात. तसेच २१ जून ह्या दिवशी सूर्य जास्तीत जास्त वर उत्तर भागात आलेला असतो ह्यालाच उत्तरायण असे देखिल म्हणतात, तर २२ डिसेंबर ह्या दिवशी सूर्य जास्तीत जास्त वर दक्षिण भागात असतो. ह्यालाच ‘दक्षिणायन’ असे देखिल म्हणतात.

ज्यावेळेस राशींची संकल्पना मांडण्यात आली त्यावेळेस ‘वसंतसंपात’ बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरवातीची रास मानली जाते. पृथ्वीच्या परांचन गतीमुळे दर ७२ वर्षांनी एक अंश ह्या प्रमाणे पृथ्वीचा अक्ष फिरतो आणि जवळपास २६ हजार वर्षांनी एक फेरा पूर्ण होतो. पृथ्वीच्या अक्षाच्या भ्रमणामुळे विषुववृत्त आणि आयनिकवृत्त ह्यांचे छेदनबिंदू ( ‘वसंतसंपात’ आणि शरदसंपात ) हे बिंदू देखिल पश्चिमेकडे सरकत असतात. राशींच्या संकल्पनेनंतर आज जवळपास हजार वर्षांनंतर ह्या दोन्ही छेदनबिंदूंची जागा बदललेली आहे व ‘वसंतसंपात’ बिंदू ‘मीन रास’ संपवून ‘कुंभ राशी’ मध्ये प्रवेश करीत आहे तर शरदसंपात बिंदू ‘कन्या’ राशीमध्ये आहे.

आपण दर १४ जानेवारी रोजी ‘मकर संक्रांत’ साजरी करतो कारण त्यावेळेस सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करीत असतो.

८८ तारकासमुहांना जेव्हा नावे देण्यात आली तेव्हा त्यांच्या आकाराचा विचार केला गेला. बहुतेक तारकासमुहांच्या आकारामध्ये एखाद्या मनुष्य, प्राणी किंवा पक्षाचा आकार योगायोगाने आढळल्याने त्यांना त्याप्रमाणे नावे देण्यात आलीत. त्यांना नावे देताना देखिल एखाद्या ऐतिहासिक संबंध असलेल्या व्यक्ती अथवा प्राण्याचा विचार केला गेला असावा. कारण बहुतेक तारकासमुहांतील व्यक्ती अथवा प्राण्याचा उल्लेख पुराणकथांमध्ये आढळतो. अशा प्रकारे ऐतिहासिक नावे देण्यामागे दोन कारणे असू शकतात एकतर ती गोष्ट खरी असू शकते किंवा पुराणकथांमुळे तो विशिष्ट तारकासमूह चांगला लक्षात राहतो.

मेष राशीचा आकार मेंढ्याप्रमाणे, वृषभ राशीचा आकार बैलाप्रमाणे, मिथुन राशीचा आकार दोन लहान मुलांप्रमाणे, कर्क राशीचा आकार खेकड्याप्रमाणे, सिंह राशीचा आकार सिंहाप्रमाणे, कन्या राशीचा आकार मुलीप्रमाणे, तूळ राशीचा आकार तराजूप्रमाणे, वृश्चिक राशीचा आकार विंचूप्रमाणे, धनु राशीचा आकार धनुष्यधारी मनुष्याप्रमाणे, मकर राशीचा आकार बकरीप्रमाणे, कुंभ राशीचा आकार पाणी वाहणार्‍या मनुष्याप्रमाणे, मीन राशीचा आकार समुद्रातील दोन माश्यांप्रमाणे दिसतो.