दुर्बीण खरेदी करण्यापूर्वी…

दुर्बीण खरेदी करण्यापूर्वी

खगोलशास्त्राची थोडीफार ओळख झाली अथवा ग्रह, तार्‍यांबद्दल थोडीफार माहिती मिळाल्यानंतर व त्यांची छान-छान चित्रे पाहिल्यावर आपल्याकडे देखिल दुर्बीण असावी, ज्यामधून आपण देखिल हवे तेव्हा अवकाशातील गोष्टी पाहू शकतो असा विचार मनात येतो. खगोलशास्त्रामध्ये आवड असणार्‍या प्रत्येकाला दुर्बिणीबद्दल आकर्षण असते. दुर्बिणीमधून चंद्रावरील विवरे, शनीची कडी तसेच गुरुचे चंद्र पाहिल्यावर आपल्याकडे देखिल दुर्बीण असावी असे त्यांना वाटते.

दुर्बीण खरेदी करण्याच्या दृष्टीने जर चौकशी केल्यास आपणास त्याबद्दलची प्रचंड माहिती सांगितली जाते, जी करताना दुर्बिणीची एवढी प्रचंड माहिती खरंच आपणास समजेल की नाही अशी शंका मनात येते. वेगवेगळ्या तांत्रिक गोष्टी बदलल्या की दुर्बिणीच्या प्रकारामध्ये व साहजिकच किंमतींमध्ये होणार्‍या बदलामुळे शेवटी कोणत्या प्रकारची दुर्बीण घ्यावी हा निर्णय पटकन घेता येत नाही. म्हणून दुर्बीण खरेदी करण्यापूर्वी खालील काही गोष्टींचा देखिल विचार करावा.

 

दुर्बिणीची किंमत किती असावी अथवा आपले बजेट किती आहे?

साधारण रु. १०००/- ते पुढे लाखो रुपयांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्बिणी विकत मिळतात. जसजशी दुर्बिणीची किंमत वाढत जाते तसतशी तिची योग्यता वाढत जाते. दुर्बिणीमध्ये वापरलेल्या भिंग अथवा आरशाच्या आकारानुसार दुर्बिणीची किंमत वाढत जाते. साधारण रु. १०-१२,०००/- पर्यंतची ४ इंची दुर्बीण घेणे योग्य ठरते. पण जर आधीच जास्त महाग व चांगल्या प्रकारची दुर्बीण घेतल्यास पुढे तिचा वापर पण योग्य होईल का याचा विचार करावा. ४ इंची दुर्बिणीतून अवकाशातील बर्‍याचशा गोष्टी व्यवस्थित पाहता येतात. उदा. चंद्रावरील विवरे, गुरुचे चंद्र, शनीची कडी इ. ह्यापेक्षा कमी कमी इंचाची दुर्बीण कमी किमतीला घेतल्यास ह्याच गोष्टी छोट्या दिसतील.

 

दुर्बीण कोणत्या प्रकारची असावी?

दुर्बिणीचे प्रामुख्याने चार भाग पडतात.

१. (Refractors) दुर्बीण म्हटली की सर्वप्रथम अशा प्रकारच्या दुर्बिणीचे चित्र डोळ्यापुढे येते. या प्रकारामध्ये एका नरसाळ्याच्या दोन टोकांना लावलेल्या भिंगाद्वारे निरीक्षक सरळ आकाशाकडे पाहू शकतो. इतर दोन प्रकारच्या मानाने ह्या प्रकारची दुर्बिणी महाग जरी असल्या तरी याची गुणवत्ता चांगली असते असे म्हटले जाते.

२. (Reflectors) ह्या प्रकाराच्या दुर्बिणीमध्ये एका नरसाळ्याच्या आतील एका टोकाला अंतर्वक्र आरसा लावून नरसाळ्यामध्ये एकत्रित झालेला प्रकाशाला आरशाद्वारे परावर्तित केला जातो. परावर्तित प्रकाश नंतर एका द्वितीय आरशाद्वारे नेत्रिकेकडे वळविला जातो. अशा दुर्बिणीमध्ये प्रकाश परावर्तित होऊन आल्याने प्रतिमा उलटी दिसते. इतर दोन प्रकारच्या मानाने ह्या प्रकारातील दुर्बिणी जास्त स्वस्त असतात.

३. (Catadioptric) ह्या दुर्बिणी आकाराने लहान असतात. थोडा मोठा व्यास असलेल्या पण लांबीने लहान असलेल्या नरसाळ्यामध्ये अंतर्वक्र आरशाद्वारे प्रकाश जमा करून एका विशिष्ट प्रकारामार्फत प्रकाश नेत्रिकेवर परावर्तित केला जातो.

४. (Cassegrain) ह्या दुर्बिणीमध्ये देखिल एका छोट्या नरसाळ्यामध्ये प्राथमिक अंतर्वक्र आरशाद्वारे प्रकाश एकत्रित केला जातो तर परावर्तित प्रकाश हा द्वितीय आरशामार्फत प्राथमिक आरशाच्या मध्यभागी असलेल्या छिद्रामार्फत नेत्रिकेवर परावर्तित केला जातो.

दुर्बिणीमध्ये अजूनही अनेक निरनिराळ्या प्रकारचे बदल असलेल्या दुर्बीण आढळतात. कोणत्या प्रकारची दुर्बीण घ्यावी हे सर्वांच्या प्रात्यक्षिकानंतर ठरवावे.

 

दुर्बिणीचा आकार केवढा असावा?

निरीक्षणाची जगा जवळच असल्यास दुर्बिणीच्या आकाराचा त्रास नसतो. परंतू जर निरीक्षणाची जागा दूरची अथवा नेहमी अनिश्चित असेल तर दुर्बीण विकत घेताना तिच्या आकाराचा देखिल विचार करावा. दुर्बिणीमध्ये काच / आरसा वापरल्यामुळे ती सावधरीत्या हाताळावी लागते. आकाराने मोठ्या असलेल्या दुर्बिणी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेताना तर फारच काळजी घ्यावी लागते, कारण दुर्बिणीस झालेले छोटे नुकसान देखिल जास्त खर्चीक असू शकते.

 

आपण दुर्बिणीचा वापर किती करणार आहात?

ह्या गोष्टीचा विचार सर्वात आधी करावा. कारण बहुतेक वेळा असे दिसून येते की दुर्बीण घेताना असलेला उत्साह नंतर कमी होऊन शेवटी दुर्बीण घराच्या कोपर्‍यात कुठेतरी पडून राहते. आपण दुर्बिणीचा वापर किती वेळा कराल, कशाचे निरीक्षण करण्यासाठी कराल तसेच आपले उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर मग दुर्बिणीचे काय करायचे हा प्रश्न पडतो. आकाराने मोठ्या असलेल्या दुर्बिणी दरवेळी निरीक्षणासाठी बाहेर घेऊन जाताना होणार्‍या त्रासामुळे नंतर त्यांचा वापर कमी होऊ लागतो.

 

त्या दुर्बिणीतून आपण काय पाहू शकता व काय नाही?

आपण जी दुर्बीण विकत घ्यायचे ठरविले असाल तिची वर्धन क्षमता आपणास माहीत असण्यासाठी सर्वप्रथम त्याच प्रकारच्या दुर्बिणीतून अवकाशातील गोष्टी किती मोठ्या दिसतात ते पाहणे आवश्यक आहे. कारण बहुतेकवेळा आपण निरीक्षणासाठी मोठ्या दुर्बिणी वापरतो व स्वतःसाठी दुर्बीण विकत घेताना महागड्या किमतीमुळे छोट्या आकाराची दुर्बीण घेतो, साहजिकच त्यातून दिसणार्‍या गोष्टीचा आकार आपणास आधी वापरलेल्या दुर्बिणीपेक्षा लहान असतो, अशावेळी नंतर आपली निराशा होते.

थोडक्यात दुर्बीण म्हणजे पैशाची आणि वेळेची केलेली मोठी गुंतवणूक असते. चांगल्या प्रकारच्या दुर्बिणीतून चांगल्या प्रकारे निरीक्षण करता येते परंतु त्यासाठी चांगल्या निरभ्र आकाशाची देखिल गरज असते. शेवटी दुर्बीण कुठल्या प्रकारची घ्यावी हे ठरविताना इतरही अनेक गोष्टींचा आपण विचार करावा.