या महिन्यात आकाशातील ग्रहस्थिती

व्हिडीओ बघण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.

ग्रहस्थिती – मार्च २०२३

बुध ग्रह –  महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्याच्या जवळ जात चाललेला बुध ग्रह महिन्याच्या अखेरीस देखील सूर्यापासून फारसा दूर जाणार नाही. त्यामुळे सूर्यप्रकाशामुळे लुप्त झाल्याने या महिन्यात बुध ग्रह आपल्याला पाहता येणार नाही.

शुक्र ग्रह – हा संपूर्ण मार्च महिना आपल्याला शुक्र ग्रह सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावर तेजस्वी ताऱ्याप्रमाणे चमकताना दिसेल. महिन्याच्या सुरुवातीलाच दिनांक 1 आणि २ मार्च २०२३ रोजी आपल्याला शुक्र आणि गुरु ग्रहाची युती पाहायला मिळेल. हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून अर्ध्या अंशापेक्षाही कमी अंतराने एकमेकांच्या जवळ येतील. दिनांक २४ मार्च २०२३ रोजी पश्चिम क्षितिजावर आपल्याला चंद्रकोरीला अगदी चिकटून खाली आपल्याला शुक्र ग्रह पहायला मिळेल. या महिन्यात शुक्र ग्रह मीन ते मेष अशा दोन तारकासामुहांमध्ये पुढे सरकताना दिसेल.

मंगळ ग्रह – या महिन्यामध्ये मंगळ ग्रह आपल्याला सूर्यास्तानंतर डोक्यावरील आकाशात दिसेल तर मध्यरात्री पर्यंत तो पश्चिम क्षितिजावर मावळताना आढळेल. वृश्चिक आणि मिथुन तारकासामुहामध्ये असलेला मंगळ ग्रह जास्त तेजस्वी नसला तरी त्याच्या लाल रंगावरून आपण ओळखू शकता. दिनांक २८ मार्च २०२३ रोजी साधारण अर्ध चंद्रबिंबाच्या बाजूलाच आपल्याला मंगळ ग्रह पहायला मिळेल.

गुरु ग्रह –  महिनाच्या सुरुवातीलाच पश्चिम क्षितिजावर सूर्यास्तानंतर आपल्याला तेजस्वी शुक्र ग्रहाच्या थोडा खाली मीन तारकासामुहामध्ये आपल्याला गुरु ग्रह आढळेल. महिन्याच्या अखेर पर्यंत सूर्याच्या अधिक जवळ जात चालल्याने या महिन्याच्या शेवट पर्यंत सूर्य प्रकाशात लुप्त झाल्याने नंतर आपल्याला गुरु ग्रह दिसणार नाही.

शनी ग्रह –  महिन्याच्या सुरुवातीला सूर्याच्या अगदी जवळ असलेला शनी ग्रह नंतर सूर्यापासून दूर जात चालल्याने आपल्याला पहाटे सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजावर उगवताना आढळेल. आसपास इतर कोणताही तेजस्वी तारा अथवा ग्रह नसल्याने शनी ग्रह आपण सहज ओळखू शकाल. दिनांक १९ मार्च २०२३ रोजी चंद्र कोरीच्या थोडा खाली कुंभ तारकासामुहामध्ये आपल्याला शनी ग्रह आढळेल.