फार पूर्वी पासून मानव आपल्या जिज्ञासेमुळे निरनिराळ्या विषयांवर विचार करून संशोधन करीत आला आहे. आजपर्यंत मानवाने सर्वच विषयांवर सखोल संशोधन केले आहे. ह्या निरनिराळ्या विषयांपैकी एक विषय होता आकाश. हजारो वर्षापासून म्हणजे आदिमानवापासून अवकाश या विषयावर विचार केला जात आहे. नंतर अवकाश हा वेगळाच विषय बनला आणि ह्या विषयाचा अभ्यास अधिक सोईस्कर व्हावा म्हणून मानवाने अवकाशातील प्रत्येक तार्यास निरनिराळे नाव दिले. पुढे ह्या प्रत्येक तार्याचे नाव व ठिकाण लक्षात ठेवणे कठीण होऊ लागले म्हणून आकाशातील तारकांचे ८८ विभाग केले व त्या तारकासमुहांना निरनिराळी नावे देण्यात आलीत.
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देखिल वेदकाळापासून अवकाशातील सर्व तारकासमुहांवर संशोधन केले गेले आहे. परंतु आपल्या येथे फक्त २७ तारका समूहांनाच देण्यात आले त्याचे कारण म्हणजे प्रती वर्षी सूर्याचा प्रवास या तारकासमुहामधून होतो.
वेदकाली नक्षत्रे चोवीस होती. तेव्हा फाल्गुनी, आषाढा आणि भाद्रपदा हे प्रत्येकी चार तारकांचे एक-एक असे नक्षत्रसमुह मानले होते. पण नंतरच्या काळात प्रत्येकी दोन तारकांचे पूर्वा आणि उत्तरा असे विभाग पाडण्यात आले आणि नक्षत्रे सत्तावीस झाली. त्यानंतर अभिजित तार्याला एक नक्षत्र मानून एकूण नक्षत्र संख्या २८ झाली. शतपथ ब्राम्हणात ही २८ नक्षत्रे दिलेली आहेत. त्याला ‘सर्वतोभद्रचक्र’ असे म्हणत असत. परंतु नंतर केव्हातरी अभिजित नक्षत्र वगळण्यात आले कारण ते नक्षत्र सूर्य-चंद्राच्या मार्गापासून फार लांब उत्तरेकडे आहे.
पृथ्वीचा ध्रृव सरळ नसल्यामुळे सूर्याच्या व चंद्राच्या उगवण्याच्या आणि मावळण्याच्या मार्गामध्ये दररोज थोड्या प्रमाणात बदल होत असतो. पृथ्वी जर स्थिर आहे असे मानल्यास सूर्य, चंद्र आणि इतर ग्रहांसोबत सर्व तारकासमूह पृथ्वी भोवती गोलाकार भ्रमण करीत असल्याचे आपणास जाणवेल ह्या सर्वांमध्ये आपण फक्त सूर्य आणि चंद्र ह्यांचाच विचार केल्यास त्यांच्या दररोजच्या उगवण्याच्या आणि मावळण्याच्या मार्गास ‘आयनिकवृत्त’ असे म्हणतात. आयनिकवृत्ताचे १२ प्रमुख भाग पाडून त्यांना ‘राशी’ असे नाव देण्यात आले व त्याच आयनिकवृत्ताचे आणखी २७ भाग पाडून त्यांना एक नाव दिले आहे आणि ते नाव आहे ‘नक्षत्र’.
सूर्य-चंद्रादी नवग्रह पूर्वेला उगवताना आणि डोक्यावरून मागे जाऊन पश्चिमेला मावळताना दिसतात. ग्रहांच्या या भासमान मार्गाला क्रांतिवृत्त किंवा आयनिकवृत्त अशी संज्ञा आहे. क्रांतिवृत्त गोलाकार म्हणजेच ३६० अंशाचे असते या क्रांतिवृत्ताचे समान १२ भाग म्हणजे १२ राशी आणि याच क्रांतिवृत्ताचे समान २७ भाग म्हणजेच नक्षत्रे होत. क्रांतिवृत्ताच्या ३६० अंशाला १२ ने भाग जातो.
त्यामुळे प्रत्येक राशी ३० अंशाची होते. त्याप्रमाणे नक्षत्र किती अंश कलेचे असते ते समजण्यासाठी थोडी आकडेमोड करावी लागेल. त्यासाठी सर्वप्रथम ३६० अंशाच्या कलाकरून घ्याव्या लागतील. १ अंश = ६० कला. त्यावरून ३६० x ६० = २१६०० कला होतात. याला २७ ने भागल्यावर ८०० कला हे उत्तर येते. म्हणजे १ नक्षत्र ८०० कलांचे असते. या कलांचे अंश करताना पुन्हा ६० ने भागावे म्हणजे १३ ने पूर्ण भाग जातो. व २० उरतात. (१३x६०=७८०+२० कला ८०० कला) म्हणजे १३ अंश २० कलांचे एक नक्षत्र होते. एका नक्षत्राच्या १३ अंश २० कला किंवा८०० कला होतात. एका नक्षत्राचे चार चरण असतात म्हणजे एका चरणाचे २०० कला होतात. २०० भागिले ६० (कला) केले तर ३ अंश पूर्ण (३x६०=१८०+२०=२०० कला) व २० कला येतात. त्यावरून ३ अंश २० कलांचे एक नक्षत्र चरण होते. आता १२ राशीत २७ नक्षत्रे म्हणजे प्रत्येक राशीत किती नक्षत्रे येतील? एका नक्षत्राचे चार चरण, तर २७ नक्षत्रांचे २७*४=१०८ चरणे होतात. १०८ ला (चरण) १२ ने भागले असता भागाकार ९ येतो. म्हणजे एका राशीत ९ चरणे येतात. चार चरणांचे एक नक्षत्र म्हणजे ८ चरणांची २ नक्षत्रे झाली. एक चरण उरले. एक चरण म्हणजे पाव भाग म्हणजे एका राशीत (९ चरणे म्हणजे) सव्वादोन नक्षत्रे येतात. दोन राशीत साडेचार नक्षत्र, तर ८ राशीत १८ आणि १२ राशीत २७ नक्षत्रांची विभागणी बरोबर होते. कोणत्या राशीमध्ये कोणती नक्षत्रे हे ठरलेले असते. नक्षत्रांमध्ये अश्विनी हे पहिले नक्षत्र आहे आणि राशीमध्ये मेष ही पहिली राशी आहे. त्यामुळे अश्विनी नक्षत्र व मेष राशीची सुरुवात एकाच बिंदूपासून होते. मेष राशी नंतर जसे वृषभ, मिथुनादी राशी ओळीने येतात तशी नक्षत्रेही ठरलेल्या क्रमाने येतात. १) अश्विनी, २) भरणी, ३) कृत्तिका, ४) रोहिणी, ५) मृगशीर्ष, ६) आर्द्रा, ७) पुनर्वसू, ८) पुष्य, ९) आश्लेषा, १०) मघा, ११) पूर्वा फाल्गुनी, १२) उत्तरा फाल्गुनी, १३) हस्त, १४) चित्रा, १५) स्वाती, १६) विशाखा, १७) अनुराधा, १८) ज्येष्ठा, १९) मूळ, २०) पूर्वाषाढा, २१) उत्तराषाढा, २२) श्रवण, २३) धनिष्ठा, २४) शततारका, २५) पूर्वाभाद्रपदा, २६) उत्तराभाद्रपदा, २७) रेवती. ही २७ नक्षत्रे असून, ती याच क्रमाने येतात. म्हणजे याच क्रमाने चंद्र एका नक्षत्रातून दुसर्या नक्षत्रात जातो. चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते त्या दिवसाचे नक्षत्र असते. साहजिकच चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते त्या व्यक्तीचे चंद्र नक्षत्र आणि चंद्र ज्या राशीत असतो ती त्या व्यक्तीची चंद्रराशी. बहुतांशी लोकांना ही चंद्रराशी माहीत असते. सव्वादोन नक्षत्राची एक राशी होते म्हणजेच चंद्र दोन-सव्वादोन दिवस एकाच राशीत असतो. साहजिकच तेवढ्या काळात जन्मलेल्या व्यक्तींची राशी एक येते, मात्र नक्षत्र वेगळे असते. उदाहरणार्थ अश्विनी ( चार चरण ), भरणी (चार चरण), कृत्तिका (एक चरण) मिळून एक चरण होते.