खगोल शास्त्राची सुरवात कशी करावी ?

खगोलशास्त्राची सुरुवात कशी कराल?

नवीनच आवड निर्माण झालेल्या खगोलप्रेमींनी खगोलशास्त्रातील आपली रुची आणि ज्ञान वाढविण्यासाठी खाली दिलेल्या ठराविक पद्धतीने अभ्यास करावा.

१) खगोलशास्त्रावर आज सर्व भाषांमध्ये अनेक प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. परंतु सुरवाती पासूनच भली मोठी पुस्तके न वाचता लहान आणि सोप्या भाषेमध्ये ‘अवकाशाबद्दल ओळख’ अशा प्रकारची पुस्तके वाचावीत. सुरवातीलाच मोठी पुस्तके वाचल्याने लगेच सर्व कळत नाहीच उलट अनेक प्रश्न निर्माण होतात. तसेच न कळल्याने कंटाळा येऊ लागतो आणि हा विषय फारच किचकट असून आपल्याला कळणार नाही अशी भावना निर्माण होते.

२) खगोलशास्त्रामध्ये टेलेस्कोप (दुर्बीण) जरी महत्त्वाची वस्तू असली तरी सुरवातीलाच विकत घेऊ नये. सुरवातीला नुसत्या डोळ्यांनी दिसणार्‍या तार्‍यांचा अभ्यास करावा. म्हणजेच तारका समूह ओळखणे, विशिष्ट तार्‍यांचे नाव लक्षात ठेवणे, त्या तारका समूहाबद्दलची कथा लक्षात ठेवणे.

३) नुसत्या डोळ्यांनी अभ्यास करताना त्या विशिष्ट तार्‍यांचा रंग कोणता आहे, त्याची दीप्ती (Magnitude) किती आहे हे पाहावे.

४) अवकाश नकाशाद्वारे तार्‍यांना आपण लगेच ओळखू शकता म्हणून अवकाश निरीक्षण करताना शक्यतो अवकाश नकाशांचा वापर करावा.

५) टेलेस्कोप घेण्यापूर्वी अनेकांचा सल्ला घ्यावा तसेच आपण ज्या प्रकारचा टेलेस्कोप विकत घेणार आहात त्यामधून किती चांगले दिसते आणि किती मोठे दिसते ते पाहावे. कारण टेलेस्कोप मधून शनी-गुरू सारखे ग्रह आपणास फुटबॉलच्या चेंडू एवढे मोठे दिसतील अशी समजूत बहुतेकांची समजूत असते. त्यामुळे प्रत्यक्षात टेलेस्कोप विकत घेतल्यानंतर शनी-गुरू ग्रहांचे आकार पाहून निराशा होते.

६) टेलेस्कोपचा चांगला उपयोग आपणास डोळ्यांना दिसत नसलेल्या व काही फिकट दिसणार्‍या तार्‍यांना तसेच अवकाशातील इतर वस्तूंना पाहण्यासाठी होतो.

७) इंटरनेटच्या माध्यमाने अत्याधुनिक माहिती ताबडतोब आपणास मिळते व खगोलशास्त्रावरील शेकडो वेबसाइट्स आहेत. म्हणून पुस्तके वाचना सोबत कॉम्प्युटरवरील इंटरनेटद्वारे खगोलशास्त्रावरील माहिती मिळवावी. त्यामुळे नवीनच लागलेल्या शोधाबद्दल अथवा संशोधनाबद्दल आपणास माहिती मिळेल.

८) आज खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी कॉम्प्युटरवर अनेक सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. त्याचा जरुर वापर करावा.

९) यासोबतच देशात खगोलशास्त्रावर अभ्यास करणाऱ्या अनेक हौशी खगोल अभ्यासकांच्या संस्था आहेत. अशा एखाद्या संस्थेमध्ये सामील झाल्यास या विषयातील आपल्या सारख्या लोकांशी ओळख होऊन ज्ञानात भर पडते.