अवकाशस्थ गोष्टींची तोंडओळख

अवकाशस्थ गोष्टींची तोंडओळख

सर्वसाधारणपणे वर्षभर पद्धतशीर अवकाश निरीक्षण करणार्‍यास सर्व अवकाशस्थ वस्तूबद्दल माहिती होते. परंतु तरीदेखील एखाद्या नवख्या अवकाश निरीक्षकास सुरवातीस काही गोष्टी ओळखण्यास कठिण जातात. आकाशामध्ये चमकणारी प्रत्येक गोष्ट ताराच असेल असे नाही. म्हणून अवकाशामध्ये चमकणारी वस्तू काय असेल त्यासंबंधीची कल्पना येण्यासाठी खालील गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे.

कृत्रिम उपग्रह ( सॅटेलाईट्स )

ही अवकाशामध्ये चमकणारी वस्तू आपणास वेगाने जाताना दिसेल. कमी वेळामध्ये ही वस्तू आपणास अवकाशातील एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाताना दिसेल. जास्तीत जास्त एक मिनिटभर ती आपणास दिसेल.

ग्रह

आपणास माहीत आहेच तरी देखिल व्यवस्थित निरीक्षण केल्यास आपणास जाणवेल की ग्रह चमकत नाहीत. तार्‍यांना स्वतःचा प्रकाश असतो तर ग्रह सूर्याचा प्रकाश परावर्तित करतात. तसेच तार्‍याच्या मानाने ते कितीतरी पट पृथ्वीच्या जवळ असल्याने त्यांचा प्रकाश स्थिर जाणवतो.

तारे

ग्रहांच्या मानाने तारे कितीतरी पट दूर असल्याने त्याच्या पासून येणारा प्रकाश पृथ्वीवरील वातावरणाच्या माध्यमातील धुलिकणांमुळे अडला जातो व इतरत्र पसरला जातो. पृथ्वीवरून त्यांना पाहताना त्याचा प्रकाश हालताना आणि तुटक मिळतो. म्हणूनच तारे चमकताना किंवा लुकलुकताना दिसतात.

उल्का

सर्वात जास्त वेगाने जाणारी तसेच क्षणात अदृश्य वस्तू म्हणजे उल्का. एखाद्या धूमकेतूची परिभ्रमण कक्षा जर पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेला छेदून गेली असल्यास, पृथ्वी सूर्य प्रदक्षिणा करताना त्या विशिष्ट जागेतून जाताना त्या धूमकेतूच्या मागे द्रव्यामधील धूलीकण, दगड इतर वस्तू गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या दिशेने आकर्षित होतात. त्यांनाच ‘उल्का’ असे म्हणतात. प्रचंड वेगामध्ये वातावरणामध्ये प्रवेश केल्यावर घर्षणाने त्या उल्का पेट घेतात. परंतु आकारमानाने लहान असल्यामुळे जमिनीवर पोहचण्या आधीच त्या नष्ट होतात. कधीतरी आकाशात पाहताना अचानक एखादा तारा तुटल्यासारखे आपणास जाणवते त्याच उल्का.

धूमकेतू

सूर्यमालेच्या टोकावर असलेले दगड सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाने खेचले जातात. हे दगड बर्फाच्छादित धुलीकणांनी गोठलेले असतात. धूमकेतू सूर्याच्या अधिक जवळ येऊ लागतो, त्यावेळेस हे बर्फाच्छादित धुळीकण विरघळून धूमकेतू पासून अलग होतात आणि धूमकेतूमागे धुलीकणांची एक शेपटी तयार होते. त्यामुळे धूमकेतू एखाद्या झाडूसारखा दिसू लागतो. काही आठवड्यांमध्ये तो आपली सूर्य प्रदक्षिणा संपवून पूर्ववत दूर जाऊ लागतो व त्याबरोबर त्याची शेपटी देखिल लहान होत होत अदृश्य होते.

तेजोमेघ

तेजोमेघ म्हणजे धुलीकणांचा मोठा संच. तेजोमेघामध्येच गुरुत्वाकर्षणाने नवीन तारे जन्माला येतात. एखाद्या तार्‍याच्या मानाने तेजोमेघ फारच मोठे असतात. लहान दुर्बिणीने पाहिल्यास आपणास एक फिकट वायूचा ढग दिसेल. मोठ्या दुर्बिणीने आपण त्यांचा आकार स्पष्ट पाहू शकतो.

अरोरा

सूर्यापासून सतत विद्युत चुंबकीय लहरी आकाशात फेकल्या जातात. या चुंबकीय लहरींना सौरवात असे म्हणतात. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने हे सौरवात ध्रुवीय भागांकडे खेचले जातात. सूर्याकडून येणार्‍या सौरवार्‍याच्या पृथ्वीवरील गुरुत्वीय पट्ट्यांशी झालेल्या घर्षणामूळे ध्रुवीय भागात प्रकाशाचे पट्टे निर्माण होतात. ज्यांना ‘अरोरा’ असे म्हणतात.