ध्रुवतारा कसा शोधावा?

ध्रुवतारा कसा शोधावा?

सूर्य उगवतो ती पूर्व आणि मावळतो ती पश्चिम दिशा. तसेच जर आपण पूर्वेला तोंड करून उभे राहिलात तर आपल्या डाव्या हाताला उत्तर दिशा आणि आपल्या उजव्या हाताला दक्षिण दिशा असेल. सूर्याच्या मदतीने आपण दिवसा लगेच दिशा ओळखू शकतो. सूर्य जसा पहाटे पूर्वेला उगवून दुपारी डोक्यावर तर संध्याकाळी पश्चिमेस मावळतो. तसाच चंद्र देखिल पूर्व ते पश्चिम प्रवास करतो. परंतु सूर्य मावळल्यावर संध्याकाळी चंद्र पूर्वेस उगवेल हे दररोज शक्य होत नाही, मुळात चंद्र दररोज ५० मिनिटे उशिरा उगवत असल्याने दररोज त्याची उगवण्याची वेळ देखिल बदलते. कधी तो संध्याकाळी उगवितो, तर आणखी काही दिवसांनी तो मध्यरात्री उगवितो, तर काही वेळेस दिवसा सूर्य डोक्यावर असताना देखिल उगवितो.

रात्रीच्या वेळेस जर चंद्र अवकाशामध्ये असेल तर त्याच्या प्रकाशित बाजूने सरळ रेषा ओढल्यास ती बरोबर आपणास पश्चिम दिशा दाखवेल. तसेच जर त्याच्या काळोख असलेल्या बाजूकडून सरळ लंब रेषा ओढल्यास ती आपणास पूर्व दिशा कळेल.

परंतु रात्रीच्या वेळेस अवकाशामध्ये चंद्र नसेल तर दिशा ओळखण्यासाठी काही तारकासमुहांची देखिल मदत होते. अशा प्रकारे रात्रीच्या वेळेस तारकासमुहांद्वारे दिशा ओळखण्याचे काही प्रकार खाली दिले आहेत.

१) इंग्रजीमधील ‘एम’ किंवा ‘डब्ल्यू’ आकाराप्रमाणे दिसणार्‍या शर्मिष्ठा तारकासमुहाच्या मधील पाच प्रमुख तार्‍यापैकी तिसर्‍या व चौथ्या तार्‍यामधून सरळ लंबरेषा आखल्यास ती रेषा सरळ उत्तर ध्रुवतार्‍याकडे जाईल.

२) सप्तर्षी तारकासमुहातील प्रमुख सात प्रमुख तार्‍यांपैकी पहिल्या दोन तार्‍यांना जोडून सरळ रेषा आखल्यास ती रेषा सरळ उत्तर ध्रुवतार्‍याकडे जाईल.

३) मृग तारकासमुहामध्ये असलेले मृगाचे तोंड नेहमीच उत्तर दिशा दर्शविते.

४) सिंह तारकासमुहामध्ये असलेले सिंहाचे तोंड नेहमीच पश्चिम दिशा दर्शविते.

तसेच वरीलपैकी कोणताही तारकासमूह अवकाशामध्ये दिसत नसल्यास आपणास ओळखता येत नसल्यास साधारण दोन-तीन तास तार्‍यांचे निरीक्षण केल्यास आपणास त्यांच्या बदललेल्या जागेवरून त्यांची उगवण्याची पूर्व दिशा लक्षात येईल.