सुरवातीला एखाद्या नवीन निरीक्षकाने शक्यतो उल्का वर्षावाच्या निरीक्षणासाठी असे उल्का वर्षाव व त्यांच्या तारखा निवडाव्यात जेव्हा त्या विशिष्ट उल्का वर्षावात तासाला निदान १५-२० उल्का पडताना दिसतील. ह्याचा फक्त सुरवातीस आनंद म्हणूनच फायदा होत नाही तर पुढे भविष्यामध्ये निरीक्षणाची नोंद करण्याचा चांगला सराव होतो. तसेच सुरवातीस आपण निरनिराळ्या प्रकारच्या आणि रंगाच्या उल्का पाहिल्यामुळे नंतर त्याची चांगलीच ओळख होते. अशा प्रकारचे निरीक्षण करताना शक्यतो निरीक्षणाची जागा शहरापासून दूर असावी जेणे करून तेथे विजेच्या दिव्यांच्या प्रकाशाचा त्रास होणार नाही. निरीक्षणाची जागा रात्रीच्या दृष्टीने सुरक्षित निवडावी. आजूबाजूला मोठे डोंगर असलेली जागा शक्यतो टाळावी. उघड्या मैदानातील जागा सर्वात सोयीची असते.
उल्कावर्षावाच्या उगम स्थानबिंदू भोवती ५० अंशाचे काल्पनिक वर्तुळ काढावे. कारण ह्या भागातूनच आपणास उल्का उगम बिंदूच्या विरुद्ध दिशेस पडताना दिसतात. ह्या काल्पनिक वर्तुळाच्या जागेस ‘दिसण्याची प्रभावी जागा’ असे म्हणतात.
उल्का वर्षावाच्या निरीक्षणाची नोंद करताना लक्षात घ्यावयाच्या काही गोष्टी –
१) | सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण घेत असलेले निरीक्षण बरोबर असणे आवश्यक आहे. |
२) | निरीक्षणात दिसलेली लहानात लहान गोष्ट देखिल नोंदविली पाहिजे. |
३) | वेळेची नोंद करताना स्थानिक वेळ तसेच जागतिक वेळ लिहिणे तितकेच आवश्यक आहे. |
४) | आपण निरीक्षण काळात मध्येच थोड्याकाळासाठी ( चहा अथवा जेवणासाठी ) विश्रांती घेतली असेल तर ती वेळ देखिल नोंदविली पाहिजे. |
५) | निरीक्षण काळात प्रकाशामूळे अथवा ढगाळ वातावरणामुळे आकाशातील तार्यांची दृश्यप्रत जर कमी अथवा जास्त जाणवत असली तर त्याकाळातील तार्यांची दृश्यप्रत नोंदविली पाहिजे. |
६) | शक्यतो अर्धा किंवा एक तास या प्रमाणे वेळापत्रक बनवून त्याप्रमाणे नोंद घ्यावी. जेणे करून नंतर निरीक्षण सरासरी काढताना कोणत्या वेळेस जास्त उल्का पाहावयास मिळाल्या याचा अंदाज येतो. |
७) | प्रत्येक उल्केची संपूर्ण माहिती उदा. तिचा रंग, दृश्यप्रत, पडण्याची दिशा. |
८) | काही वेळेस उल्का पडताना तिची मागे छोटी शेपटी देखिल तयार होते अशा वेळेस विशिष्ट चिन्ह देऊन त्याची नोंद करावी. |
९) | तर काही वेळेस आपणास एखादी मोठी उल्का ( प्रखर अग्नी झोत ) पाहावयास मिळते त्याची देखिल विशिष्ट चिन्ह देऊन नोंद करावी. |
१०) | कोणत्याही कारणास्तव आपले निरीक्षण काही कारणासाठी थांबले असल्यास तो काळ देखिल विश्रांती काळ म्हणून नोंदवावा. |
११) | ढगांमुळे आकाशाची बदलणारी परिस्थिती सारखी नोंदविण्यापेक्षा १५-२० मिनिटांच्या वेळाने ढगांचे सरासरी टक्के प्रमाण लिहावे. |
१२) | काही वेळेस जो आपण विशिष्ट उल्का वर्षाव पाहत आहोत त्या व्यतिरिक्त इतरत्रपण वेगवेगळ्या उल्का पडताना आढळतात त्याचीपण नोंद करावी. |
निरीक्षणाच्यावेळी सोबत घ्यावयाच्या गोष्टी –
१) | आपल्याला सतत आकाशाकडे पाहायचे असल्याने एक चांगली आरामखुर्ची बसण्यासाठी घ्यावी, सोबत बाजूला एक टेबल घ्यावे ज्यावर आपणास आवश्यक सर्व गोष्टी असाव्यात. सतरंजीवर झोपून निरीक्षण करणार असल्यास उशी आवश्यक आहे. |
२) | निरीक्षणाची नोंद करण्याची कागदपत्रे. |
३) | रात्रीच्या जागरणामध्ये झोप येऊ नये म्हणून गरम चहा असलेला थर्मास व ग्लास, पाण्याची बाटली. |
४) | रात्रीचे हलके जेवण जेणे करून जेवल्यानंतर झोप येणार नाही. |
५) | बरोबर वेळ असलेले ( शक्यतो डिजीटल ) घड्याळ. |
६) | थंडी वाजू नये म्हणून गरम कपडे. |
७) | सोबत एक बॅटरी ज्यावर लाल जिलेटीन पेपर लावावा ज्यामुळे डोळ्यांना त्रास होणार नाही. |
८) | शक्यतो उल्का वर्षावाचे निरीक्षण समूहाने करावे ज्यामुळे निरीक्षणास मदत होते. |