रात्रीच्या वेळी दिशा कशी ओळखाल?

रात्रीच्या वेळी दिशा कशी ओळखाल?

दिवसा जसे सूर्याच्या उगविण्यावरुन पूर्व दिशा व मावळण्यावरुन पश्चिम दिशा आपण ओळखू शकतो त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी पण दिशा ओळखणे तितकेसे कठिण नाही.

  • सूर्याप्रमाणेच रात्री जर आकाशामध्ये चंद्र असेल तर चंद्राच्या कलेवरुन आपण पूर्व आणि पश्चिम दिशा ओळखू शकतो. रात्री चंद्र ज्या दिशेन पूढे सरकत असेल ती दिशा पश्चिम हे नक्की.
  • आकाशामध्ये जर चंद्र नसेल तर तार्‍यांवरुन देखिल दिशा ओळखता येतात. रात्रीच्यावेळेस तार्‍यांचे साधारणपणे थोडावेळ निरीक्षण केल्यास आपणास तारे पृथ्वीभोवती गोलाकार फिरताना कुठल्या दिशेने उगवितात ते कळेल, त्यावरुन पूर्व दिशा कुठली ते कळेल आणि सहाजिकच त्यावरुन जर आपण ‘पूर्व’ दिशेला तोंड करुन उभे असाल तर आपल्या डाव्या हाताकडील दिशा ही ‘उत्तर दिशा’ व उजव्या हाताकडील दिशा ही ‘दक्षिण दिशा’ तर आपल्या पाठिमागची ही ‘पश्चिम दिशा’ हे आपल्याला कळेल.

    अशाप्रकारे वर सांगितल्याप्रमाणे जर उत्तर दिशा आपल्याला कळल्यानंतर जर आपण काहीवेळ उत्तर दिशेकडील तार्‍यांचे निरीक्षण केल्यास आपल्याला आढळेल की तेथिल तारे एक छोट्याश्या रिंगणामध्ये गोल फिरत असून तेथिल एक तारा एकाच ठिकाणी स्थिर जाणवेल, तोच पृथ्वीचा “धृवतारा”.

  • “धृवतारा” पृथ्वीच्या गोलाकार फिरण्याच्या अक्षावर असल्याने तो एकाच ठिकाणी स्थिर दिसतो. तर “धृवतारा” पृथ्वीच्या ‘उत्तर दिशेला’ आहे.
  • आपल्याला जर आकाशातील तार्‍याचे थोडेफार जरी ज्ञान असेल तरी आपण आकाशातील काही ठळक आणि मोठ्या तारकासमुहांच्या साहाय्याने दिशा ओळखू शकता.
  • आकाशातील “सप्तर्षी तारकासमुहातील” पूढील दोन तार्‍यांपासून एक सरळ रेष ओढल्यास ती ‘उत्तर दिशेला’ असलेल्या ‘धृवतार्‍याकडे’ जाईल.
  • आकाशातील “मृग” म्हणजेच “ओरायन” तारकासमुहातील हरणाचा काल्पनिक आकार पाहिल्यास त्या हरणाचे तोंड नेहमीच ‘उत्तर दिशेला’ असते.