उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणजे काय?

उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणजे काय?

पृथ्वी ३६५ दिवसांमध्ये सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. हे जरी सर्वांना माहीत असले तरी तिचा स्वतःभोवती फिरण्याचा अक्ष सरळ नसून २३.५ अंशाने कललेला आहे हे मात्र अनेकांना माहित नसते.

पृथ्वी २३. ५ अंशाने एका बाजूस कललेली आहे आणि त्याच परिस्थितीमध्ये ती सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करते. ह्या कललेल्या अवस्थेमुळे काय परिणाम होतात ते जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण पृथ्वीची कललेली स्थिती एका उदाहराणाने समजावून घेऊया. एका टेबलावर मधोमध चेंडू ठेवा आणि असे समजा की तो सूर्य आहे. आता हातामध्ये एक पेन घ्या. पेनाचा आकार गोल नसला तरी थोड्या वेळासाठी त्याला आपण पृथ्वी समजूया. आता पेनाला सरळ उभे धरलेल्या अवस्थेमध्ये सूर्य असलेल्या चेंडू भोवती फेरी मारा. पेनाने चेंडू भोवती फेरी मारताना एक गोष्ट आपणास कळेल की सर्व बाजूंनी पेनाचे चेंडूपासूनचे अंतर सारखेच होते.

आता हातामध्ये पकडलेला पेन सरळ न पकडता थोडासा तिरका पकडा आणि त्याच अवस्थेमध्ये चेंडू भोवती एक फेरी मारा. आता आपणास कळेल की पेनाची वरची एक बाजू एकवेळेस चेंडूच्या जवळ येते तर त्याच्या विरुद्ध ठिकाणी ती बाजू दूर जाऊन पेनाची खालची बाजू चेंडूच्या जवळ येते तर दोन समोरासमोरील ठिकाणी पेन आणि चेंडू मधील (म्हणजे पृथ्वी आणि सूर्य) अंतर सारखेच असते.

पृथ्वीदेखील कललेल्या अवस्थेमध्येच सूर्याभोवती फेरी मारीत असल्याने काही वेळेस पृथ्वीचा उत्तर ध्रृवाकडील भाग सूर्याच्या जवळ येतो. तर सहा महिन्यांनी पृथ्वीच्या दक्षिणेकडील भाग सूर्याच्या जवळ येतो. तर सहा महिन्यांच्या अंतराने दोन दिवशी सूर्य-पृथ्वी अंतर सारखेच असते.

पृथ्वीची जी बाजू सूर्याच्या जवळ असते तेथे उन्हाळा तर जी बाजू दूर असते तेथे हिवाळा असतो. कमी-जास्त तापमानामुळे ऋतू होतात. जर अक्ष कललेला नसता तर ऋतू झालेच नसते.

आपण जर दररोज सूर्याच्या उगवण्याच्या किंवा मावळण्याच्या जागेचे निरीक्षण केले तर सूर्याची बदललेली जागा लक्षात येईल. ज्यावेळेस पृथ्वीची उत्तर ध्रृवाकडील बाजू सूर्याच्या जवळ येते तेव्हा सूर्य जास्तीत जास्त उत्तरेला सरकलेला असतो. २१ मार्च ते २१ जून पर्यंत सूर्य उत्तरेला सरकतो. यालाच ‘उत्तरायण’ असे म्हणतात. तर २२ सप्टेंबर तर २२ डिसेंबर पर्यंत सूर्य दक्षिण दिशेस सरकतो. यालाच ‘दक्षिणायन’ असे म्हणतात. तर २२ मार्च आणि २२ सप्टेंबर या दोन दिवशी सूर्य बरोबर पूर्व दिशेस उगवतो. ह्या दोन तारखांना ‘विषुवदिन’ असे म्हणतात. ह्या दिवशी दिवस-रात्र समान बारा-बारा तासांचे असतात.