सूर्यमालेतील सातवा ग्रह म्हणजे युरेनस. बुध पासून शनी पर्यंत सर्व ग्रह नुसत्या डोळ्यांनी दिसत असले तरी शनी नंतरचे इतर ग्रह पाहण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता भासते. या ग्रहाचा शोध १३ मार्च १७८१ रोजी विल्यम हर्षल याने लावला. वास्तविक शंभर वर्ष त्याआधी हा ग्रह काही शास्त्रज्ञांनी पाहिला होता. परंतु त्याची नोंद एक तारा अशी केली गेली होती. या ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर साधारणतः २, ८७०, ९७२, २०० कि. मी. ( 19.19126393 A.U.) आहे. स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास या ग्रहास १६ तास लागतात. तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास यास ८४ वर्षे लागतात. युरेनसची सूर्यप्रदक्षिणा पश्चिमेकडून पूर्वेकडे असली तरी त्याचे स्वतःभोवती फिरणे मात्र पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. याचा व्यास साधारणतः ५१, ११९ कि. मी. आहे.
युरेनसचा आस ९८ अंशांनी कललेला असल्यामुळे तो घरंगळत चालल्या सारखा दिसतो. त्यामुळे कधी त्याच्या धृव भागाचे तर कधी विषुववृत्तीय भागांचे दर्शन घडते.
अंतराळयानांनी पाठविलेल्या माहितीनुसार या ग्रहाभोवती देखिल शनी ग्रहाप्रमाणे कडे आढळून आले आहे. ही कडा युरेनसच्या केंद्रभागापासून ५०, ००० कि. मी. अंतरावर आहे. पण ही कडा दुर्बिणीतून दिसत नाही.
या ग्रहास एकूण २७ चंद्र आहेत. ज्यामध्ये पाच मोठे चंद्र आहेत आणि दहा लहान चंद्र आहेत ज्यांचा शोध अलीकडेच पाठविलेल्या व्हॉएजर या यानामुळे लागला.
युरेनस आपल्या कक्षेवरून एका सेकंदाला एक मैल सरकतो. युरेनस भोवती देखिल चुंबकीय क्षेत्र असल्याचे आढळून आले आहे.