शुक्र

शुक्र

सूर्यमालेतील शुक्र हा बुधग्रहानंतरचा दुसरा ग्रह. ह्याचा आकार जवळपास आपल्या पृथ्वी एवढा आहे. याचा व्यास १२, १०४ कि. मी. आहे. या ग्रहास देखिल आंतर ग्रह म्हणतात. कारण हा ग्रह देखिल सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये आहे. याच मुळे हा ग्रह देखिल आपणास फक्त सकाळी किंवा संध्याकाळी दिसतो.

या ग्रहावरील वातावरण अतिशय दाट असल्याने सूर्याचा त्यावर पडलेला प्रकाश मोठ्या प्रमाणावर परावर्तित होतो. त्यामुळे शुक्र अन्य ग्रहापेक्षा फारच तेजस्वी दिसतो.

शुक्राचा स्वतःभोवती फिरण्याचा काल आणि सूर्याभोवती फिरण्याचा काळ यामध्ये मोठे वैशिष्ट्य जाणवते. शुक्राला स्वतःभोवती फिरण्यास २४३ दिवस लागतात. तर सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २२५ दिवस लागतात. म्हणजेच शुक्रावरील एक दिवस हा त्याच्या वर्षापेक्षाही मोठा आहे.

शुक्राचे सूर्यापासूनचे अंतर १०८, २०८, ९३० कि. मी. ( 0.72333199 A. U.) आहे. शुक्राचा स्वतःभोवती फिरण्याच्या दिशेमध्ये कमालीचे वैशिष्ट्य आहे. सूर्यमालेतील इतर सर्व ग्रह सारख्या म्हणजेच पश्चिमेपासून पूर्वेकडे फिरतात. फक्त शुक्र हा एकच ग्रह विरुद्ध म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. याचा परिणाम असा शुक्रावर सूर्य पूर्वे ऐवजी पश्चिमेकडे उगवतो आणि पूर्वेकडे मावळतो.

सूर्याभोवती फिरताना त्याच्या सूर्याकडील बाजूचे तापमान सरासरी ७३० अंश असते.

शुक्र ग्रहाला बुध आंतरग्रह आहे. शुक्रावरून बुध फक्त सकाळी आणि सायंकाळी दिसू शकतो. शुक्राला देखिल एकही चंद्र नाही.

इतर ग्रहांच्या माहितीसाठी खाली क्लिक करा.