गुरु

गुरु

सूर्यमालेतील पाचवा ग्रह गुरू, गुरू म्हणजे एक श्रेष्ठ स्थान. नावाप्रमाणेच सर्व ग्रहांचा गुरू आहे. कारण त्याचा आकारच त्याचे मोठे वैशिष्ट्य आहे. हा सर्व ग्रहांमध्ये सर्वात मोठा आहे. त्याचा व्यास साधारणतः १, ४२, ९८५ कि. मी. आहे. दुसर्‍या शब्दांमध्ये सांगायचे तर आपल्या पृथ्वी सारख्या अकरा पृथ्वी या ग्रहाच्या व्यासावर ओळीने सहज बसू शकतील. त्याचे सूर्यापासूनचे अंतर ७७८, ४१२, ०१० कि. मी. ( 5.20336301 A.U.) आहे.

बुध, शुक्र, पृथ्वी व मंगळ हे ग्रह घनरूप पदार्थांनी बनलेले आहेत. याउलट गुरुचा अंतर्भाग हा द्रवरूप लोखंडाचा आहे व या द्रवरूप चेंडूच्या बाहेरच्या भागात वायूचे दाट ढग आहेत. ह्या ढगांमुळेच गुरुवर आडवे पट्टे दिसतात. ह्या ग्रहाचा पृष्ठभाग वायुरुप असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर वादळ होत असतात. ह्याच वादळांमुळे या ग्रहांवर एक मोठा भोवरा निर्माण झाला आहे. ज्याचा आकार पृथ्वीच्या तिप्पट आहे. ज्यास रक्तरंजित लाल ठिपका असे देखिल म्हणतात.

प्रचंड आकारामुळे त्याचे गुरुत्वाकर्षण देखिल प्रचंड आहे. इतकेच नाही तर त्याचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग देखिल प्रचंड आहे. स्वतःभोवती फेरा मारण्यास त्यास ९ तास ५० मिनिटे लागतात. सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यास त्यास १२ वर्ष लागतात. याचाच अर्थ गुरू दरवर्षी एका राशीमध्ये वास्तव्य करतो. पृथ्वीप्रमाणेच गुरू देखिल एक मोठा चुंबक आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे १६ जुलै १९९४ रोजी शुमेकर लेव्ही-९ हा धूमकेतू या ग्रहावर आदळला. या टकरीत या धुमकेतूचे अनेक तुकडे होऊन ते दूरवर पसरले. ही प्रक्रिया २२ जुलै १९९४ पर्यंत चालू होती. तो धूमकेतू गुरू ऐवजी पृथ्वीवर आदळला असता तर काही क्षणातच पृथ्वीवरील सजीव सृष्टी नष्ट झाली असती. इतकी तीव्रता या धूमकेतूमध्ये होती.

दुर्बिणीने पाहिल्यास त्याचे चार चंद्र फार सुंदर दिसतात. सर्व प्रथम गॅलिलिओने या चंद्रांना पाहिल्याने यास गॅलिलिओचे चंद्र देखिल म्हणतात. त्यांची नावे अशी आहेत – इयो, युरोपा, गॅनिमेड व कॅलिस्टो. यामधील गॅनिमेड हा तर बुध ग्रहापेक्षा देखिल मोठा आहे.

आतापर्यंत गुरू ग्रहाचे ७९ चंद्र शोधण्यात आले आहेत. तसेच शक्तिशाली दुर्बिणीने पाहिल्यास या ग्रहा भोवती कडा देखिल आढळून आली आहे.

इतर ग्रहांच्या माहितीसाठी खाली क्लिक करा.